आरोग्यम धनसंपदा
Tuesday, 30 July 2024
माका अर्थात भृंगराज
माका अर्थात भृंगराज
आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो.
यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्ही ऐक महिना सेवन
केल्यास नक्की शंभर वर्षे निरोगी जगाल अस ग्रंथात नमुद केल ते खरोखर अतिशयोक्ती
नाही. माक्याचा रस यकृताची क्रीया सुधारते. आम्ही केसांसाठी नित्य माकारस व माकाकेश
तेल सांगतो. माका तेलात तळून केशतेल गुण देत नाही.शीरपाक विधीने केलेले तेलच उपयोगी
ठरते. माका अर्थात भृंगराज रस गोदुधात मीसळावा नंतर तिळतेलात उकळावा जे तेल शिल्लक
राहील ते तेल केसांसाठी गुणकारी ठरते. चला असा माका कीती गुणकारी आहे बघूया माका -
भृंगराज Latin Name - Eclipta prostrata ग्रंथोक्त नावे - (सं.) भृगराज, ( म .
) माका - माका ही वनस्पती शेतात व पाणथळ दलदलयुक्त जमिनीत होते. हिचे रोप
अर्ध्या फुटापासून चांगले पोसले असता एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते. सामान्य रोप
जमीनीवर पसरते ; परंतु उसाच्या शेतातील माका उंच वाढतो व तो एक ते दीड फूट उंच असू
शकतो . याची पाने बारीक , लांबट व काहीशी खरखरीत असतात. पानांवर व खोडावर बारीक लव
असते . ओलसर जागी हा बाराही महिने होतो . त्याच्या तीन जाती आहेत. १ ) पांढरा, २
) काळा, ३ ) पिवळा. हे प्रकार विशषेतः कांड व फुले यावरून करतात . पिवळा माका
बंगालमध्ये अधिक मिळतो . आपल्याकडे काळा व पांढरा दोन्ही मिळतात व वापरतात . निळसर
काळा माका उत्तम असून तो रसायन कार्यास उत्तम आहे. माका श्राद्धकर्मातही वापरतात
याचा केशरंजनास उपयोग केला जातो म्हणून याला केशरंजक, कुंतलवर्धक अशी नावे आहेत.
याने केसांचे वर्धन होते म्हणून केश्य । म्हणतात . श्राद्ध प्रयोगात वापरतात म्हणून
पितप्रिय म्हणतात . देवांच्या पत्रीत असता तो देवाला वाहतात म्हणून हरिप्रिय,
हरिवास अशी नावे आहेत . याच्या वापराने केस भुग्यांच्या वर्णाप्रमाणे काळे होतात
म्हणून भृगराज असे नाव आहे . माक्याचे समूळ रोप औषधांत वापरतात. मोठ्या मात्रेने
उलट्या होतात . गुणधर्म - रस - कडू विपाक - कडू वीर्य - उष्ण गुण-रूक्ष, तीक्ष्ण
दोषघ्नत्व - वायु, कफ कार्य - दीपन, पाचन, मूत्रजनन, बल्य, अनुलोमन, वर्ण्य,
त्वच्य, केश्य, नेत्र्य, दन्त्य, मेघ्य, आमपाचक, रोपण, व्रणशोधन. माक्यास
रसायन मानतात ही अतिशयोक्ती नाही . याची मुख्य क्रिया यकृतावर आहे. विनिमय क्रिया
सुधारतो. पित्तस्राव नीट होतो. आमाशय , यकृत व पक्वाशय यातील क्रिया सुधारते . या
तीन क्रिया सुधारल्यामुळे सर्व शरीरास तेज येते . ( डॉ . देसाई ) रोगघ्नत्व -
कफजस्थौल्य, पांडु, त्वग्रोग, आम विष, शिरोरोग, नेत्ररोग, कास, श्वास,
कुष्ठ, कृमि, हृद्रोग, कंडू, कंठरोध. त्वग्रोग श्चित्र - माक्याचे पंचांग
लोखंडाच्या कढईत तेलात तळून रोग्यास द्यावे व त्यावर असाण्याच्या साराचा कीस व पाणी
घालून आटविलेले दूध प्यावयास द्यावे . कृमि - कळंब, माका व निर्गुण्डी यांचा पाला
वाटून पिठात कालवून त्याची पोळी करून द्यावी म्हणजे कृमिंचा नाश होतो. लाख ,
निर्गुण्डी , माका व दारुहळद यांच्या काढ्याच्या देवकापसास सात भावना द्याव्या .
त्या कापसाची वात तुपाच्या दिव्यात घालून काजळ धरावे व ते डोळ्यांत घालावे .
डोळ्यांतील पित्तरोग नाहीसा होतो . शिरोरोग - पलित भोकराचे व बेहड्याचे बी, तीळ व
अळशी यांचे समभाग करड कांगोणीचे बी घेऊन त्याला नीली, शिरीष, कोरांटा व माका
यांच्या रसाच्या भावना द्याव्यात . नंतर ही बीजे शेळीच्या दुधात वाटून लोखंडास
त्यांचा लेप करावा . उन्हात तापत ठेवल्याने त्यातून जे तेल गळते ते नाकात घालून
दुधावर राहिले असता पलितरोग म्हणजे केस पिकणे हे नष्ट होते . तसेच दूध , कोरांटा रस
, माक्याचा रस , तुळशीचा रस ही सर्व एक एक प्रस्थ घेऊन ४ तोळे ज्येष्ठमध व १६ तोळे
तेल सिद्ध करून दगडाच्या पात्रात किंवा मेंढ्याच्या शिंगात ठेवून नाकात घालावे .
लोहाचे चूर्ण , माका , त्रिफळा व काळी माती ही एक महिना उसाच्या रसात ठेवून डोक्यास
लावली असता केस हळुहळु काळे होतात . वरील प्रयोग ग्रंथात दिले आहेत , अनुभव घ्यावा
. रसायन उपयोग - १) माक्याचा रस १ महिन्यापर्यंत पिऊन दुग्धाहार ठेवावा . माका
रसायन म्हणून देत असता दुग्धाहाराची आवश्यकता आहे . तसेच कफवात प्रकृतीच्या
स्थौल्यजन्य विकारांत वापरतात . त्याने बल , वीर्य वाढून आयुष्यवृद्धी होते . हे
रसायन कफवात प्रकृतीस व जुनाट रोगांत द्यावे . २ ) माक्याचा पाला तुपात तळून
पथ्याने नियमित घेत जावा . त्यावर असाण्याच्या साराचे कल्कात सिद्ध केलेले दूध
प्यावे व त्याच दुधावर राहावे . असे एक महिना घ्यावे . त्याने रोग न होता
दीर्घायुष्य लाभते . हे उत्तम बुद्धिवर्धक आहे . उपलब्ध रसायने - १ ) श्रृंगराज तेल
२) भूनिंबादि क्वाथ ३) श्रृंगराजासव ४) सूतशेखर ५) कृमिकुठार भावना माका वर्ज -
कृश विकारांत वापरलेला आढळत नाही . हा फार दिवस वापरल्यास कफमेद क्षपण होऊन वजन कमी
होऊ लागते . त्यावेळी बंद करावा . सामान्य उपयोग - माका हे रसायन अस्थिधातुचा मल,
केश व दात व मज्जाधातुमल नेत्रस्नेह , त्वक्स्नेह व पूरीषस्नेह यांची शुद्धी करतो .
दातांवरही कार्य होते . कफवातनाशन कार्य करतो पित्तदुष्टी दूर करतो . कफमेदाचे
क्षमण करून मलशोधनाचे कार्य विशेष करतो . ही क्षुद्र वनस्पती आहे म्हणून त्याचे
कार्य अल्पकाल टिकते . म्हणून रसायनात दीर्घकाल वापरण्याची जरूर आहे . माका - मेद,
अस्थि , मज्जा यावर विशेष कार्य करतो . यकृतातील आमपाचन कार्य करून रक्ताचे शोधन
होते . आम्लपित्त - वृद्ध वैद्य भूनिंबादि क्वाथ देतात त्यात माका आहे . विषघ्न -
यकृताची क्रिया बिघडून एका जातीचे शारीरिक विष याला आम म्हणतात . ते शरीरात जमते.
त्यामुळे आमवात , चक्कर , डोकेदुखी , दृष्टिमांद्य व त्वग्रोग होतात . त्यावर
माक्याचा उत्तम उपयोग होतो . कासात - रिंगणी , डोरली , माका यांचे स्वतंत्रपणे रस
मधातुन घ्यावेत . त्यामुळे कफ सुटून कफज कास बरा होतो . स्वरभेद - वातज स्वरभेदावर
कासविंदा , डोरली , माका अंगरसात सिद्ध केलेले तूपऊन करून भोजनोत्तर लगेच प्यावे.
त्यामुळे स्वरभेदाचा नाश होतो . ( वा . क्षयरोग चि . ) संदर्भ -कै.शंकर दत्तात्रेय
फणसळकर सर ओलसर जमिनींत माक्याची झाडे बाराही महिने असतात . माका वातहारक आहे.
कोंकणांत पितृपक्षाच्या दिवशी याचे रायतें करितात . माक्यांत काळा माका म्हणून एक
जात आहे . यास काळी फुले येतात . ही झाडे क्वचित् असतात . ही गुणाने जास्त आहेत .
निळा माका - उष्ण , पाककाळी तिखट, रसायन; व कृमि, वायु व कफ यांचा नाशक आहे.
(१) उपदंशव्रणाची शुद्धि होण्यास - माक्याच्या रसाने अगर माक्याच्या व जाईच्या
पाल्याचा रस एक करून त्याने व्रण धुवावे . ( २ ) सूर्यावर्त व अर्धशिशीवर -
माक्याचा रस व बकरीचे दूध समभाग उन्हात ऊन करून नाकांत घालावे : अथवा माक्याच्या
रसांत मिरी वांटून लेप ( ३ ) मुलांच्या सर्दीवर - मूल जन्मताच घशांत कफाचा जोर
झालेला ता , घसा घुरघुरतो ; त्यास माक्याचा अंगरस दोन थेंब काढून त्यांत चौपट मध
आलून त्यांतील मिश्रण बोटाने त्या मुलाच्या टाळ्यांत पोचवितांच सर्व कफ निघून ताव
मूल हुशार होते याविषयीं सुईणीने सावधगिरी ठेविली पाहिजे . ( ४ ) धनुर्वातावर -
मक्याचा रस १ , तुंब्याचा रस 1 आल्याचा रस २ , कात्रेनिर्गुडीचा रस १ .
अगस्त्याच्या पाल्याचा रस ३ , या प्रमाणाने सर्व रस एक त्यांत नारळाचा अंगरस चौपट
घालावा , व थोडे तांदूळ घालून क्षार करावी : गुळ घालन शक्तीप्रमाणे ही क्षीर दररोज
दोन वेळ द्यावी . उतार - तुप , कांदा . ( ५ ) काविळीस - माक्याच्या रसांत मिरपूड ६
मासे घालून तो दह्या बरोबर द्यावा . दिवस ७ . ( ६ ) मुलांच्या पोटांतील डबा
वगैरेंवर - मक्याचा रस व तूप एकत्र करून द्यावे . दिवस ३ . ( ७ ) पारा अंगांत फुटला
तर माक्याचा रस , अगस्त्याचा रस व सोरा वांटून ताकांत कालवून ते ताक ४ तोळे प्यावे
; म्हणजे मूत्रमार्गाने पारा निघून जातो . ( ८ ) सुजेवर - माक्याच्या रसांत मिरपूड
घालून द्यावी व अंगासही चोळावी . ( ९ ) मोडशीवर - माक्याचा रस सैंधव घालून द्यावा .
मोठ्या मनुष्यांस छटाक रस द्यावा . ( १० ) अग्निदग्ध व्रणावर - व्रण बरा होत
आल्यावर त्या जागी दिवसांतून दोन तीन वेळ माक्याचा व काळ्या तुळशीच्या पाल्याचा रस
काढून लावीत जावा , म्हणजे त्या जाग्यावर कुष्टा सारखा पांढरा डाग न पडतां
अंगासारखा वर्ण होतो . (११ ) मेदोरोगावर - नित्य रात्रौ निजते वेळी माक्याचा अंगरस
सर्वांगास चोळून जिरवावा आणि निजावें . याप्रमाणे सतत सहा महिनेपर्यंत केल्याने
अतिशय वाढलेला मेद आणि मेदाच्या योगाने शरीरांत जागोजाग झालेल्या गांठी यांचा नाश
होतो . ( १२ ) मुखपाका वर - माक्याचा पाला अर्धा तोळाप्रमाण तंबाकूप्रमाणे वारंवार
चावून तोंडांत धरावा व पिंक टाकीत जावी . ( १३ ) आग्निमांद्य , विडूबंध , व
पांडुरोगावर - माका मुळांसह छायेंत सुकवून त्याचे चूर्ण , व तितकेंच त्रिफळ्याचे
चूर्ण , व या सर्वांबरोबर साखर एकत्र करून ते चार तोळे योग्य अनुपानाशी द्यावें . (
१४ ) स्वरभेदावर माक्याचा रस व तूप एकत्र करून रस आटवून तूप प्यावे . संदर्भ
-वनौषधी गुणादर्श " हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले
आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य
असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि
त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट
होत आहे . " कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक
वाक्य कित्येक लोकांच्या मुखातून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या
सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली
आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टींचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची
फार आवश्यकता आहे." - शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८९३ साली लिहिलेल्या
पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ] टिप- माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद
केले आहेत. आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक
शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर
तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा
समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे
औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु
शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
Tuesday, 6 April 2021
भीमसेनी आयुर्वेदीक कापूर
भीमसेनी आयुर्वेदीक कापूर
----------------------------------------------------------
हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही स्फटीकासारखा येतो ,
ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते
■ सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत.
■ नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
■ रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
■ पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा.
■ तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
कोंड्याकरीता : –
सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे
■ नेहमीच्या कापरात मेण असते , त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा.
आरती करताना,
गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर,
दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात,
श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
---------------------------------------------------
■ दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
■खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात
घराची दृष्ट काढण्यासाठी
संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही,
-----------------------
इतर उपयोग
------------------------
१ ) प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येत एक सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही
पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुखत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरून कुबट वास येतो तो कापूर ठेऊन जातो
२ ) डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात
३ ) कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात
४ ) रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही
५) गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित
६ ) कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल
----------------------------------------------
कापूर पवित्र का मानला जातो ?
----------------------------------------------
जाणुन घ्या धार्मिक कारण
१)शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
२) ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.
३) कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात.
४) कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
--------------------------------
वैज्ञानिक महत्त्व
----------------------------------
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की , कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.
-----------------------------------------------
कापूराचे अजून काही फायदे
----------------------------------------------
१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो
६)मूठभर कापूर तव्यावर ४० सेकंड ठेऊन हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( ५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी )
कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण करतो
Tuesday, 23 March 2021
लाकडी कंगव्याचे फायदे
पूर्वी केसांना विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरला जात असे आणि कदाचित यामुळेच लोकांचे केस अधिक सुंदर असायचे.आपनास माहिती नसेल परंतु जेव्हा केस लाकडी कंगव्याने विंचरले जातात तेव्हा केस कमी गळतात आणि कोंडा ही कमी होतो. याशिवाय लाकडी कंगवा वापरल्याने डोकेदुखी देखील दूर होते.लाकडी कंगवा वापरण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकित करतील:
1. टाळूसाठी लाकडी कंगवा खूप चांगला आहे.लाकडी कंगव्याने केसांची वाढ चांगली होते आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुद्धा वाढते.
२. लाकडी कंगव्याच्या वापराने केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. हे केसांची गुणवत्ता देखील सुधारित करते. या कंगवाच्या वापराने केसांची मुळे मजबूत होतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
3. लाकडी कंगवा वापरुन केसांना कोणतीही इजा होत नाही. तज्ञांच्या मते, इतर कोणत्याही कंगव्याच्या वापरामुळे केस मध्यभागी फुटतात किंवा चमक कमी होते, परंतु लाकडी कंगवाच्या वापराने केसही मध्यभागी मोडत नाहीत किंवा चमकही जात नाही.
4. जर आपल्या केसांमध्ये कोंडा खूप जास्त असेल तर हा कंगवा वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लाकडाच्या कंगवाच्या वापराने तेलाच्या ग्रंथी उघडतात, ज्यामुळे टाळू कोरडी होत नाही आणि कोंडाची समस्या देखील दूर होते.
5. बर्याच लोकांचे टाळू खूप संवेदनशील असतात. अशा लोकांना लाकडी कंगवा वापरणे खूप फायदेशीर आहे.या व्यतिरिक्त अशी बरीच लाकूड (जसे की कडुनिंब) देखील वापरल्यामुळे डोकेदुखी कमी होते. कोम्बिंग दरम्यान, लाकडाचा अर्क टाळूच्या माध्यमातून शरीरात जातो, ज्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो.
Monday, 22 March 2021
खाद्यतेल.... कोणते? किती? कसे खावे?
*खाद्यतेल.... कोणते ?? किती?? कसे खावे ??*
(याबाबतीत माहितीपुर्ण लेख)
पूर्वीच्या काळी जिलेबीची ताटेच्या ताटे सहज फस्त करून ,पचवणारे अनेक लोकं सहज आढळतं , पण आता मात्र तळलेला पदार्थ म्हटला ,की *कोलेस्टेरॉल* नावाचा बागुलबुवा सगळ्यांसमोर उभा राहतो आणि खाण्यातली सगळी मजाच निघून जाते !
खरं म्हटलं तर पुरी ,पापड,वडे,भजी, जिलबी यासारख्या तळलेल्या पदार्थामुळे जेवणाला एक वेगळीच लज्जत येते.
त्यामुळे कोणते तेल वापरायचं ? किती वापरायचं ?
पदार्थ तळलेला चालेल ? की परतलेला ?,की नुसती फोडणी द्यावी ? तेल कोणते खावे? किती खावे?
हे सर्व health counsious असलेल्या घराघरात चर्चेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि तेवढेच ज्वलंत विषय झालेले आहेत.
आयुर्वेद शास्त्रानुसार *तेल* असा शब्द आला तर तिळाचे तेलचं अभिप्रेत असते.
वेगळे कुठले तेल म्हणायचे असेल तर मोहरीचे,जवसाचे तेल असा उल्लेख येतो. *घृत ,तेल,वसा आणि मज्जा* अशा चार प्रकारचे मुख्य स्निग्ध पदार्थ आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्यापैकी *घृत* म्हणजे *साजूक तूप* हे सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्या खालोखाल नंबर लागतो तेलाचा. त्यातही *तिळाचं तेल हे सर्वश्रेष्ठ* मानलेले आहे .तूप ,वसा आणि मज्जा हे तीनही स्नेह प्राणिज आहेत आणि 'तेल' हा एकच स्निग्ध पदार्थ वनस्पतीपासून मिळतो.
*तेल हे परम वातशामक आहे* तेलाच्या स्निग्धता उष्णता,स्थिरता अशा गुणांमुळे , शरीरात वातदोष वाढला असता येणारा कोरडेपणा, खरखरीतपणा, थंडपणा, अस्थिरपणा हे तेलामुळे कमी होतात. आपल्या शरीरातील बहुसंख्य घटक हे स्निग्ध पदार्थापासून निर्मित आहेत व त्यांचे पोषण करण्यासाठी आहारात स्निग्ध द्रव्यांची नितांत आवश्यकता असते.
सध्या बिन तेलाच्या चपात्या,अगदी कमी तेल असलेल्या किंवा पाण्याच्या फोडणीच्या भाज्या, पाव बिस्किटे असा रुक्ष आहार, हल्ली त्वचेला बाहेरूनही तेलाचा स्पर्श फारसा होतंच नाही आणि मनातही कुणाबद्दल स्नेह नाही ,असा एकूणच कोरडा व्यवहार समाजात वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वार्धक्यात वातदोष वाढल्यामुळे शरीरात होणारे बदल , जे सामान्यपणे सत्तरी नंतर दिसतात, ते हल्ली फार लवकर म्हणजे चाळीस-पन्नास च्या सुमारास घडताना दिसत आहेत. *यामध्ये स्निग्ध पदार्थांचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे.* सांधे दुखणे, त्वचा कोरडी, भेगाळलेली असणे, केस गळणे, झोप शांत न लागणे, मन चंचल होणे ,विस्मरण असे अनेक दुष्परिणाम, योग्य स्निग्ध पदार्थांच्या अभावामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. म्हणूनच तेलाचा आहारात योग्य उपयोग करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. फक्त तेल वापरताना काही गोष्टींची काळजी मात्र जरूर घेतली पाहिजे .
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे हा प्रश्न हल्ली बऱ्याच गृहिणींना पडलेला असतो ,पण थोडे बारकाईने निरीक्षण केले, तर असे लक्षात येते की, भारतामध्ये पूर्वीपासूनच ज्या प्रदेशात जे पीक उपलब्ध आहे ,तिथे ते तेल वापरण्याचा स्वाभाविक प्रघात होता. अगदी आत्ताही उत्तरेकडे सामान्यपणे तिळाचं तेल व थंडीच्या दिवसांमध्ये मोहरीचे (सरसोचे) तेल हे पिढ्यानपिढ्या वापरले जाते. दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या नारळाचे तेल ,सरसकटपणे स्वयंपाक करणे,अंगाला- डोक्याला लावणे व अन्य सर्वच उपयोगासाठी वापरले जाते. महाराष्ट्र , गुजरात या भागांमध्ये भुईमुगाचे तेल वापरण्याची अनेक वर्ष परंपरा आहे व ती अतिशय योग्य आहे .यामागे आयुर्वेदातील एक सामान्य तत्व आहे, की *जिथे जे मोठ्या प्रमाणात पिकते ,ते तिथल्या लोकांच्या आहारात वापरण्यासाठी योग्य असते*. त्यामुळे जेवण बनवण्यासाठी, आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे पारंपारिकरित्या जे तेल वापरतात ते आपल्यासाठी सुद्धा योग्य आहे अशी खूणगाठ बांधावी.भारतात राहून ऑलिव्ह ऑईलची गरज नाही, हे आत्त्तापर्यंत सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल .
या सगळ्या सुव्यवस्थेत गडबड केव्हा झाली, तर जेव्हा आपण पूर्वीपासून जे कच्च्या घाणीचे (कोल्ड कॉम्प्रेस्ड) तेल वापरत होतो, त्याठिकाणी रिफाइंड तेल वापरायला लागलो तेव्हापासून !
कोलेस्ट्रॉल वाढणे,स्थौल्य,ह्रुद्रोग इत्यादी दुष्परिणाम रिफाईंड तेलाच्या वापरामुळे लोकांमध्ये दिसू लागले आणि दोष मात्र विनाकारण आपल्या पारंपरिक तेलांना दिला गेला. एकेकाळी आपल्या कोकणात घरोघरी वापरण्यात येणाऱ्या गावठी खोबरेल तेलाला त्यातील saturated fats मुळे , व्हिलन मानण्यात आले होते, आज त्याच खोबरेल तेलाचे गुण लक्षात आल्यावर, पाश्चात्य लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
तेलाच्या बाबतीत अजून काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. तेल जेवढे जास्त गरम होईल किंवा जितका जास्त काळ गरम होत राहील ,तेवढे त्यामध्ये घातक बदल होतात .त्यामुळे खाण्यासाठी कच्च्या घाणीवर काढलेले किंवा कोल्ड कॉम्प्रेस्ड पद्धतीने काढलेले तेल वापरणे सुरक्षित आहे. हे तेल काढताना मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत नाही ,त्यामुळे त्यात शरीरासाठी घातक असणारे बदल होत नाहीत.
घाणीवर काढलेल्या तेलाला, लवकर खवट वास येतो आणि ते लवकर खराब होते , त्यामुळे त्याच्यावर **हायड्रोजनेशनची* प्रक्रिया करून, हे तेल, रिफाईंड तेल या स्वरूपात बाजारात येऊ लागले, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत त्याचा साठा करून ठेवता येईल. पण हीच रिफाइंड करण्याची प्रक्रिया आरोग्यासाठी मात्र अतिशय घातक आहे आणि त्यातूनच शरीरात अनावश्यक मेद जमण्याची प्रक्रिया चालू होते .
कच्च्या घाणीचे तेलही, शक्यतो कच्च्याच स्वरूपात वापरावे . म्हणजेच कोरड्या चटणीवर वरून घेणे, उकडीवर घेणे, भाकरीला लावून खाणे उत्तम !. तेल अशा स्वरूपात वापरल्यास, त्यामुळे शरीराला आवश्यक स्निग्धता तर मिळतेच, पण अनावश्यक चरबी वाढत नाही.
दुसरा प्रकार आहे 'फोडणी देणे ' . फोडणी करताना सुद्धा, तेल गरम होऊ लागताच, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद अशा गोष्टी घातल्या जातात आणि लगेचच त्यावर भाजी किंवा वरण टाकण्यात येते , त्यामुळे तेल जास्त काळापर्यंत उकळत नाही. त्यामुळे 'फोडणी' हा तेल वापरण्याचा, उत्तम आरोग्यदायी व रुचकर पर्याय आहे. मात्र जेव्हा तेलात तळले जाते ,तेव्हा दीर्घकाळपर्यंत हे तेल उकळत राहिल्यामुळे, त्यामध्ये शरीरात नको असणाऱ्या ट्रान्स फॅट्सची निर्मिती होते . ही ट्रान्स फॅट्स मधुमेह, ह्रदरोग, कॅन्सरसारख्या रोगाना आमंत्रण ठरू शकतात. त्यामुळे रस्त्यावर मिळणारी वडे ,भजी खाणे, ज्याचे तेल हे दिवसातून शंभर वेळा गरम होते ,सतत उकळत राहते , अशा प्रकारचे तळलेले पदार्थ मात्र आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्याचप्रमाणे परतण्याची क्रिया, ज्यामध्ये थोड्या तेलावर, खूप वेळ, एखादी वस्तू परतली जाते - जसे अळूवड्या, वांग्याचे काप , मासे असे पदार्थसुद्धा शरीरात अनावश्यक मेद जमण्यास कारणीभूत असतात. 'वनस्पतीजन्य तूप' हेही त्यातील वाढलेल्या ट्रान्सफॅट्स मुळे शरीरासाठी धोकादायक असते. साजूक तुपामुळे वजन वाढते म्हणून, नाके मुरडणारे लोक, अशा प्रकारच्या वनस्पतीजन्य तूप वापरलेल्या बेकरी पदार्थ व फ्रोझन डेजर्टवर मात्र तुटून पडताना दिसतात.
तेल आणि तेलाचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा (1 ग्राम मधून 9 कॅलरी ) मिळत असते. या ऊर्जेचा जर वापर झाला नाही तर न वापरलेल्या कॅलरी मेदाच्या स्वरूपात पोटावर, स्तन ,मांड्या या सर्व ठिकाणी जमा होतात . त्यामुळे तेल यथावश्यक खाणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर पुरेसा व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे.पूर्वीच्या काळी लोकांना भरपूर श्रमाची कामे करावी लागतं, म्हणूनही भरपूर प्रमाणात तेल-तूप खाऊनही काहीही दुष्परिणाम फारसे दिसत नव्हते.
विविध खाद्यतेलांविषयी आधुनिक विज्ञानामध्ये खूप संशोधन झालेले आहे. खाद्यतेलाचा विषय निघताच सॅच्युरेटेड, मुफा, पुफा , ओमेगा 3 ,ओमेगा 6 असे अनेक शब्द आपल्या कानावर आले असतीलचं
. स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड व अन् सँच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात 22 ते 25 डिग्री तापमानाला गोठणारे स्निग्ध पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड व या तपमानाला द्रव स्थितीत राहणारे म्हणजे unsaturated असे ढोबळमानाने म्हणता येईल. परंतु संपूर्णपणे unsaturated असणारी तेले नैसर्गिकरित्या उपलब्ध नाहीत.
Unsaturated fats हे पण दोन प्रकारचे असतात polyunsaturated (Pufa) व monounsaturated (Mufa) .
Mufa मध्ये ओमेगा जातीची fatty acids असतात .खाद्यतेलांची निवड करताना ओमेगा 6 ओमेगा 3 फॅटी अँसिडच्या प्रमाणावर निवड करावी असे आधुनिक शास्त्र सांगते. हे प्रमाण 4 : 1 असायला हवे .
पारंपारिक भारतीय खाद्य तेलामध्ये शेंगदाणा ,मोहरी ,जवस तेल व साजूक तूप यामध्ये ओमेगा-3 व ओमेगा 6 हे गुणोत्तर आदर्श प्रमाणाच्या जवळपास आहे.
याउलट आजकाल जाहिराती द्वारा खूप प्रचलित झालेली सूर्यफूल, करडई आणि मका या तेलात मात्र घातक ओमेगा 6 हे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेही तेले टाळणेच उत्तम. ओमेगा 6 हे प्राण्यांच्या चरबीत व Saturated तेलात जास्त असते त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याचे आणि रक्तवाहिन्या आकुंचित होण्याचे प्रमाण वाढते, कॅन्सर, संधिवात, मोतीबिंदू ,अकाली वृद्धत्व अशा अनेक विकारांमध्ये ओमेगा 6 चा हातभार आहे. याउलट ओमेगा-3 जातीची मेदाम्ले, आरोग्यकारक असून, ती रक्त पातळ ठेवायला, गुठळ्या कमी करायला मदत करतात. हृदयाची गती नियमित करतात व ट्रायग्लिसराइड चे प्रमाण खाली आणतात, तसेच इन्शुलिनची परिणामकारकता वाढवतात. कॉड लिव्हर ऑईल , जवसाचे तेल बदाम ,अक्रोड यांचे तेल यामध्ये ओमेगा ३ असते. साजूक तुपात ओमेह ३ भरपूर असल्यामुळे, आहारात साजूक तुपाचा वापर, रोज एक ते दोन चमचे इतका अवश्य करावा. मात्र साजूक तुपात तळून न खाता, गरम वरण भात, चपाती किंवा भाकरीला लावून साजूक तुपाचा उपयोग करावा.
आयुर्वेदानुसार साजूक तूप हे सर्व स्नेहात श्रेष्ठ आहे. त्याला आज आधुनिक विज्ञानसुद्धा अनुमोदन देते आहे.
तेलाची निवड बरोबर केली, की महिन्याकाठी तेलाचा वापर, प्रतिमाणशी एक किलोपेक्षा जास्त नको. आपल्याला मधुमेह आणि हृदयविकार असल्यास, हेच प्रमाण साधारण अर्धा किलो इतके कमी असावे. प्रत्येक व्यक्तीची त्याचे वय,कामाचे स्वरूप, राहण्याचा प्रदेश, पचनशक्ती ,चालू असणारा ऋतू यानुसार तेलाची गरज, काही प्रमाणात बदलू शकते . जसे हिवाळ्यात शरीराला तेलाची गरज जास्त असते, म्हणून संक्रांतीच्या काळात तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे. कोरड्या हवामानाच्या नागपूर सारख्या प्रदेशात, दमट हवामानपेक्षा स्निग्ध पदार्थांची गरज जास्त असते. म्हणून पदार्थावर वरून कच्चे तेल घेण्याची विदर्भात पद्धत आहे .
काही तेलांचे विशिष्ट गुणधर्म पाहूया -
*तिळाचे तेल*-
आयुर्वेदानुसार सर्व तेलांमध्ये तिळाच्या तेलाला श्रेष्ठ मानले आहे. तेल या शब्दाचा अर्थच तिळापासून निघालेले असा आहे. तिळाचे तेल हे शरीरामधील सूक्ष्मातिसूक्ष्म पोकळ्यांपर्यंत पोचू शकते. ते स्वभावाने उष्ण आहे, वातपित्तनाशक, पण कफ न वाढवणारे आहे . या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे तेल कृश व्यक्तींना पुष्टी देणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे आहे . कृमिनाशक, मळ बांधून आणणारे व जसा संस्कार करू तसा गुण देणारे आहे. त्यामुळे आयुर्वेदातील बहुतेक औषधी तेले
बनवण्यासाठीही, तिळाचे तेलचं वापरले जाते. मात्र तीळ तेल जास्त प्रमाणात खाल्ल्यास, त्वचारोगाला कारण ठरते.
*मोहरीचे (राई /सरसो) तेल* -
हे तेल गुणाने उष्ण आहे व उग्र वासाचे आहे. हिवाळ्यात वापरणे योग्य. पित्तकर व कृमिनाशक आहे . फोडणीसाठी, लोणच्यासाठी वापरतात. उत्तरेकडे हिवाळ्यात वापरले जाते . बाहेरून लावल्यास थंडी व त्वचारोगांपासून बचाव करते. या तेलात ओमेगा 3 जातीची मेदाम्ले, प्रचुर प्रमाणात असतात, त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी उत्तम आहे .
*जवसाचे तेल* ( flaxseed /linseed oil )-
यालाच अळशीचे तेल असेही म्हणतात. आजकाल या तेलाचे महत्त्व खूप वाढले आहे, कारण त्यामध्ये मोठया प्रमाणात असलेले omega -3 हे मेदाम्ल. ओमेगा 3 च्या फायद्याबद्दल आपण पूर्वीच चर्चा केली आहे . ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत त्यामुळे हे मेदाम्ल शरीराला सहजा सहजी मिळत नाही. मासे, अक्रोड, बदाम,मोहरी, मेथी, जवस या पदार्थातून ओमेगा 3 मिळू शकते . ओमेगा 3 मुळे उच्चरक्तदाब, संधी विकार, कर्करोग व स्थूलता यापासुन संरक्षण मिळते स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी आणि नैराश्य कमी होते ,रजोनिवृत्ती संबंधी असणाऱ्या तक्रारी जवसाच्या सेवनामुळे कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करावा. जवसाच्या बिया बडीशेपेप्रमाणे तव्यावर परतून, किंचित मीठ लावून, मुखवास स्वरूपातही खाता येतात. मात्र जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सलाडवर वरुन घ्यावे. तापवल्यास त्याला उग्र वास येतो व त्यातील गुणवत्ता कमी होते. सरसकटपणे, सर्वच ऋतुमध्ये ,सर्व प्रकृतीच्या लोकांनी, जवस खाणे योग्य नाही. उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती , उन्हाळ्याचा काळ यामध्ये जवसासारख्या उष्ण तेलाचा वापर टाळावा किंवा अत्यंत विचारपूर्वकच करावा.
*खोबरेल तेल* -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक प्रमाण आहे, त्यामुळे ते खाण्यासाठी घातक आहे, असा चुकीचा निष्कर्ष पूर्वी काढण्यात आला होता. परंतु त्यातील medium chain fatty acid हृदयाला हितकर आहेत व त्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते, हे आता सिद्ध झाले आहे. saturated fats चेही अनेक लाभ आहेत. विशेषतः मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचा मोलाचा वाटा आहे. 'अल्झायमर डिसीज (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) या आजारामध्ये खोबरेल तेल अतिशय प्रशंसनीय आहे' , असे नवीन संशोधन सांगते. त्यामुळे ज्याठिकाणी खोबरे मोठ्या प्रमाणात पिकते, अशा केरळ, कोकणासारख्या प्रदेशात, खोबरेल तेल आहारात नेहमी वापरणे योग्य आहे. त्याशिवाय अन्य लोकांनीही योग्य प्रमाणात खोबरेल तेलाचा समावेश, आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. बुद्धिदाता गणेशाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणाऱ्या आपल्या पूर्वजांचे , अशा वेळी कौतुक वाटल्यावाचून राहत नाही .
असो, तेल हा विषय इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे , की त्यावर कितीही पाने लिहिता येईल, पण लेखन मर्यादेचे भान राखून आता इथेच थांबते.
परंतु या सर्व विवेचनावरून, कुठल्याही ही एकांगी संशोधनावर अवलंबून न राहता , आपले पारंपारिक ज्ञान, आपला अनुभव आणि आधुनिक संशोधन या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड घालून , सर्वसमावेशक विचार केल्यास, आपण छान तेला- तुपाचे खाऊनही, निश्चितच आरोग्यवान राहू शकतो, याची खात्री तुम्हा सर्वांना पटली असेलच.
Sunday, 21 March 2021
आपले पाय मजबूत ठेवा
*आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*
▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*
▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*
▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*
▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*
▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*
▪️ *एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.* *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*
▪️ *म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*
▪️ *आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*
▪️ *आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*
▪️ *गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*
▪️ *मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*
▪️ *मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*
▪️ *तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*
▪️ *पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*
▪️ *दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*
▪️ *अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*
▪️ *जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*
▪️ *वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*
▪️ *जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*
▪️ *तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*
▪️ *अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.*
▪️ *पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*
▪️ *आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*
▪️ *केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.*
▪️ *रोज किमान ३०/६० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम पायांचे स्नायू सशक्त राहतील.*
*आपल्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*
Thursday, 18 March 2021
एनिमिया किंवा रक्ताची कमतरता....
*एनिमिया किंवा रक्ताची कमतरता....*
एनिमिया किंवा रक्ताची कमतरता भारतामध्ये आजकाल सामान्य समस्या आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे आपण फक्त अशक्तच होत नाही तर रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अदिवासी बाहुल्य क्षेत्रात काही हर्बल उपयांचा वापर करतात. आज आपण जाणून घेऊया एनिमिया सारखी समस्या दूर करण्यासाठी काही हर्बल उपाय. जे अवलंबुन आज देखील जंगलात राहणारे अदिवासी या रोगाचे निदान करत आहेत.
सैवंध मीठ आणि लसनाचे सेवन केल्याने रक्त शुध्द होते. ज्या लोकांना रक्तातील प्लेटलेट्सची कमतरता आहे त्यांनी देखील मीठ आणि लसुनचे समान प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेवणासोबतच लसुनच्या कच्च्या पाकळ्या आणि सैवंध मीठाचे सेवन खुप फायदेशीर मानले जाते.
पालकाचा रस दिवसातुन 3 वेळा अवश्य घेतला पाहिजे. पालकामध्ये व्हिटॅमिन ABC आणि E व्यतिरिक्त प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन, थायमिन, फायबर, रायबोफ्लौविन आणि लोह तत्त्व असतात.
जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणत एकत्र करुन प्यायल्याने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो आणि ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांचे रक्त वाढते.
ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेची समस्या आहे त्यांनी एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायला पाहिजे. असे केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त वाढते.
ज्या घरात टोमॅटोचा जास्त वापर होतो त्या घरात एनिमियाचे लक्षण दिसत नाही.
मक्याचे नरम हिरवे कनस भाजून खाल्ल्याने ते चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील असतात. मक्याचे दाने उकळून खाल्ल्याने स्वादूपिंड मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम देखील करते.
सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढवते. सिंघाड्यामध्ये प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फोरस, लोह, खनिज तत्त्व, व्हिटॅमिन, स्टार्च आणि मॅग्नीज सारखे महत्त्वपूर्ण तत्त्व असतात. कच्च्या सिंघाड्याचे सेवन रक्ताचे प्रमाण वाढवण्यात मदत करते.
रक्ताची कमतरता असलेल्या रोग्यांनी जर अनंतमूल, दालचीनी आणि बडी सोप समान प्रमाणात घेऊन चहा सोबत उकळून कमीत कमी तीन दिवसात एकदा प्यायल्याने रक्त स्वच्छ होते. यासोबतच रक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेत मदत मिळते.
लाजाळू
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*ओळख ओषधी वनस्पती*
*लाजाळू.....*
=========
लाजाळूच्या झाडाला कोणी स्पर्श केला तर त्याची पाने पाने मिटतात. आपल्या या गुणधर्मामुळे या वनस्पतीला मराठीत लाजरी, संकोचनी; हिंदीमध्ये लाजवती, लज्जावंती; गुजरातीमध्ये लजमणी, रिशामणी; संस्कृतमध्ये लज्जिका, लज्जालु असे म्हणतात. संपूर्ण भारतामध्ये आढळून येणारी ही वनस्पती औषधी गुणांनी भरलेली आहे. अनेक आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. आज तुम्हाला या वनस्पतीशी संबंधित सर्व आदिवासी उपायांची माहिती देत आहोत...
1. लाजाळूच्या मुळाचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेल्यास पुरुषांमधील वीर्याच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. पाताळकोट येथील आदिवासी अशा रुग्णांना लाजाळूच्या बियांचे 4 ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर दुधातून घेण्याचा सल्ला देतात. एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारत्मक बदल दिसून येतील.
2.लाजाळूचे 100 ग्रॅम पाने 300 मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळेल.
3. लाजाळूच्या बियांचे चूर्ण (3 ग्रॅम) दुधासोबत मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.
4. लाजाळूच्या झाडाला आदिवासी बहुगुणी औषध मानतात. यांच्यानुसार हे रोपटे जखम लवकर भरून काढण्यात सक्षम आहे. या रोपाच्या मुळाचे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळेस कोमट पाण्यातून घेतल्यास अंतर्गत जखम लवकर ठीक होऊ शकते.
5. आधुनिक वैज्ञानिक शोधानुसार हाडांचे तुटणे आणि मांसपेशीमधील अंतर्गत जखमेच्या उपचारामध्ये लाजाळू रोपाचे मूळ महत्त्वाची भूमिका बजावते. जखम ठीक करण्यात या रोपाचे मूळ सक्रियतेने कार्य करते.
6. लाजाळूचे पाने पाण्यामध्ये बारीक करून हे मिश्रण नाभीच्या खाली लावल्यास लाघवी जास्त होणे बंद होते. या पानांचा 4 चमचे रस दिवसातून एकवेळेस घेतल्यास लाभ होतो.
7. लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि भगंदर रोग ठीक होतात. काही आदिवासी लाजाळूच्या पानांचा रस मुळव्याधीच्या जखमेवर लावण्याचा सल्ला देतात. यांच्या मते हा रस जखम कोरडी करण्यास मदत करतो.
8. लाजाळूच्या पानांची एक चमचा पावडर लोण्यामध्ये मिसळून भगंदर किंवा मुळव्याधीच्या जखमेवर दिवसातून तीन वेळेस लावण्याचा सल्ला देतात.
Subscribe to:
Posts (Atom)
माका अर्थात भृंगराज
माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...
-
*खाद्यतेल.... कोणते ?? किती?? कसे खावे ??* (याबाबतीत माहितीपुर्ण लेख) पूर्वीच्या काळी जिलेबीची ताटेच्या ताटे सहज फस्त करून ,पचवणारे अनेक ल...
-
पूर्वी केसांना विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरला जात असे आणि कदाचित यामुळेच लोकांचे केस अधिक सुंदर असायचे.आपनास माहिती नसेल परंतु जेव्हा केस ...
-
भीमसेनी आयुर्वेदीक कापूर ---------------------------------------------------------- हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही स्फटीकासारखा ...